पीसीबीचे माजी अध्यक्ष झिया यांचा गौप्यस्फोट
लाहोर – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी भक्कम पाठिंबा दिल्यानेच वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची कारकीर्द वाचली, असा गौप्यस्फोट पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष तौकीय झिया यांनी केला आहे.
करोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शोएब सातत्याने भारतीय खेळाडूंवर टीका करत सुटला असला तरी त्याची कारकीर्द एका भारतीय व्यक्तीमुळेच वाचली हे तो विसरत आहे, अशा शब्दात झिया यांनी शोएबला घरचा आहेर दिला आहे.
एका सामन्यातील पंचांनी तक्रार केल्यानंतर शोएबला त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत चाचणीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी त्याच्या हाताचे कोपर गोलंदाजी करताना आयसीसीने ठरविलेल्या निकषांपेक्षा जास्त वाकते असा अहवाल सादर करण्यात आला होता व त्याची शैली योग्य होत नाही तो पर्यंत त्याला गोलंदाजी टाकण्यावर बंदी लावण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती. त्यावेळी दालमिया यांनी चाचणी समितीला शोएबच्या हाताचा कोपरा जास्त वाकत असला तरी तो त्याचा जन्मजात दोष आहे. त्यामुळे तो चेंडू टाकताना चक्क फेकल्यासारखे दिसून येते. मात्र, त्यात तथ्य नाही. त्यामुळे विनाकारण हा मुद्दा वाढविणे योग्य नाही. त्याला गोलंदाजी करण्यास अडकाठी करू नये असे सांगितले होते.
शोएबने 1997 साली वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. त्याची चाचणी 2001 साली जेव्हा काही तक्रारी आल्यानंतर घेतली गेली व त्याचवेळी जर दालमियांनी पाठिंबा दिला नसता तर त्याची कारकीर्द त्याचवेळी संपुष्टात आली असती. आयसीसीचे अध्यक्ष असल्यामुळे दालमियांचे व्यवस्थापनावर वर्चस्व होते. त्यामुळे त्यांच्या मताचा आदर राखत समितीने शोएबला क्लीनचीट दिली, असेही झिया यांनी स्पष्ट केले.