नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमात अनेक नवनव्या गोष्टी घडणार आहेत. स्पर्धेत चक्क एक क्रीडामंत्रीही एक खेळाडू म्हणून स्पर्धेपूर्वी होत असलेल्या लिलावात सहभागी होणार आहेत. कोलकाता रणजीपटू तसेच आंतरराष्ट्रीय व आयपीएल क्रिकेट मंत्री बनण्यापूर्वी गाजवलेल्या मनोज तिवारीने यंदाच्या मोसमात स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली असून त्याला कोणता संघ खरेदी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
यंदाच्या मोसमासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी बीसीसीआयने 590 व अतिरिक्त 9 अशा 599 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व आता पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
मनोज तिवारी यांनी आयपीएलमध्ये यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रायजिंग पुणे सुपरजायंट आणि पंजाब किंग्ज संघाकडून खेळ केला आहे. त्यांनी 98 सामन्यात 1 हजार 695 धावा केल्या असून यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. याचबरोबर गोलंदाजीतही चमक दाखवताना 7 बळी मिळवले आहेत. 2018 साली पंजाब किंग्जकडून त्यांनी आपला अखेरचा आयपीएल सामना खेळला होता. यंदाच्या लिलावात त्यांनी आपली बेस प्राईस 50 लाख रुपये ठेवली आहे.
त्यांनी 2020 सालच्या मोसमासाठीच्या लिलावातही सहभाग घेतला होता. मात्र, त्यावेळी त्यांना कोणत्याही संघाने खरेदी केल नव्हते. त्यापूर्वी 2018 सालच्या लिलावात मनोज तिवारी यांच्यासाठी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्याच मोटी स्पर्धा रंगली होती व अखेर पंजाब किंग्जने त्यांना 1 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात घेतले होते.
यानंतर मात्र, त्यांनी अचानक क्रिकेटमधून एक्झिट घेतली व पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रवेश करत गेल्या वर्षी तृणमूल कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते शिबपूर मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी भाजपच्या रतिन चक्रवर्ती यांना पराभूत केले. ते सध्या ममता बॅनर्जीं यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.