शिक्रापूर – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील निषेध नोंदविण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शिक्रापूर (ता. शिरूर) येथे व्यापारी संघटनांनी बंदचा निर्णय घेत सोमवारी सायंकाळी उशिरा शिक्रापूर पोलिसांना निवेदन देत बंद पुकारत असल्याचा निर्णय जाहीर केला.
सोशल मीडियावर बंदबाबत संदेश दिला. मात्र, सायंकाळी उशिरा अचानक बंदच्या निर्णयाने अनेक व्यापारी व व्यावसायिक संभ्रमात पडले. त्यानंतर सकाळी व्यावसायिकांनी बंद पुकारला. मात्र काही व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू ठेवले असताना गावातील काही तरुणांना त्यांचे व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले. मात्र, काही संघटनांनी घेतलेल्या मनमानी निर्णयाने अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून शिक्रापूर येथील बंद शांततेत पार पडला आहे.
व्यापारी संघटना नेमक्या कशा ?
शिक्रापूर येथे दीड हजार हून अधिक लहान मोठे व्यावसायिक असून गावामध्ये दोन व्यापारी संघटना उदयास आलेल्या आहे. मात्र, या व्यापारी संघटनाबाबत अनेक व्यावसायिकांना काहीही माहिती नसून त्यांनी घेतलेले निर्णय देखील मोजक्या लोकांमध्ये घेतले जात आहेत. व्यापारी संघटना नेमक्या कोणत्या, कोणाच्या व कशा असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.