Beed Lok Sabha Election 2024 – पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना आम्ही ओबीसी (OBC) मानत नाही. कारण ओबीसीच्या आंदोलनावेळी त्या कुठेही दिसल्या नाहीत. वंजारी, माळी, धनगर, बारा बलुतेदारांवर अन्याय होताना त्या कुठे होत्या? त्यामुळे त्या कोणत्या पक्षाच्या आहेत हे ही आम्हाला माहिती नाही. आमचा लढा ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आहे, अशा शब्दांत ओबीसी बहुजन पार्टीचे उपाध्यक्ष प्राध्यापक टी. पी. मुंडे (T.P. Munde) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर टीका केली. (Split in OBC votes in Beed; OBC Bahujan Party candidate announced against Pankaja Munde)
ओबीसी बहुजन पक्षाने (OBC Bahujan Party )पंकजा मुंडेंविरोधात बीड लोकसभा मतदार संघात यशवंत गायके (Yashwant Gayke) यांना उमेदवारी दिली आहे. आम्हाला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा आशीर्वाद आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला अंधारात ठेवून ओबीसींवर अन्याय केला. आमचा मराठा समाजाला विरोध नाही, पण त्यांना ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्यास विरोध आहे, असेही मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.
मुख्य विरोधी उमेदवार बजरंग सोनवणे –
बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना बीडच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशीच मुख्य लढत पहायला मिळणार आहे. मात्र ओबीसी बहुजन पक्षाने आपला उमेदवार जाहीर केल्याने पंकजा मुंडे यांना पडणाऱ्या मतांमध्ये फूट पडून पंकजा मुंडे यांना मोठा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आणि ओबीसी मतदार बहुसंख्य आहे. दरम्यान, बीड लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर निकाल 4 जून रोजी जाहीर होतील.
पंकजा मुंडेच्या मागे धनजंय मुंडे खंबीर –
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघासाठी (Beed Lok Sabha Constituency) भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंकजा मुंडेच्या मागे धनजंय मुंडे खंबीरपणे उभे आहेत. पंकजा मुंडेंचा विजय निश्चित असून निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना लोकसभेत विजय करण्यासाठी नुकतीच महायुतीच्या सर्वच आमदार माजी आमदार आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासह शिवसेना आणि इतर मित्र पक्षाचे सर्वच मोठे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर ते बोलत होते.