अबाऊट टर्न: स्पायडर मॅन

हिमांशू

स्पायडर मॅन खरोखर अवतरला तर…? नाही, हा निबंधाचा विषय नाही. एखाद्याला खरोखर स्पायडर मॅन दिसला तर कसं वाटेल, असा साधासुधा प्रश्‍न आहे. कुणालाही फॅण्टसी वाटण्याची शक्‍यता आहे. अर्थात ही घटना केवळ डोळ्यापुढं आणावी, चिंतावी इतकी दूरची राहिलेली नाही, असं म्हटलं तर ही तंत्रज्ञानाची नवी कमाल वाटू शकते. परंतु या घटनेशी तंत्रज्ञानाचाही काडीचा संबंध नाही. लोकांना स्पायडर मॅन दिसला ही गोष्ट खरीच आहे.

मुंबईत विरार भागात एका चारमजली इमारतीवर चढताना अनेकांनी हा स्पायडर मॅन साक्षात पाहिला. फरक एवढाच की कॉमिकमधला किंवा पडद्यावरचा स्पायडरमॅन लोकांना संकटातून वाचवताना दिसतो. मुंबईतला स्पायडर मॅन लोकांमुळंच संकटात सापडला. एवढंच नव्हे तर लोकांनी त्याला तडाखेसुद्धा दिले. त्याची यथेच्छ धुलाई झाल्यानंतर हा स्पायडर मॅन कोण आणि कुठून आला, याचा बोध झाला. नैसर्गिक संकटं कमी म्हणून की काय, मानवनिर्मित संकटांचा मुकाबलाही मुंबईकरांना पावलोपावली करावा लागतो. त्यातलं मोठं संकट म्हणजे चोरांचं.

लोकलमध्ये एखाद्या “फटका गॅंग’चा मेंबर कधी मोबाइल हिसकावून पसार होईल सांगता येत नाही आणि भाजी घेता-घेता खिशात हात घालावा, तर खिसा फाटून पाकीट गायब झाल्याचं लक्षात येतं. तात्पर्य, इमारतीच्या भिंतीवर चढणारा हा स्पायडर मॅन सुद्धा वस्तुतः चोरच असावा, असा ही घटना पाहणाऱ्यांचा समज झाला आणि त्याला फटके खावे लागले.

हल्ली चोर हाती लागला किंवा हाती लागलेला माणूस चोर आहे, असा संशय जरी आला तरी त्याला मरेपर्यंत मारायचे, असे आदेश अज्ञात शक्‍तीने गर्दीला दिलेत. त्या पार्श्‍वभूमीवर स्पायडर मॅन नशीबवान ठरला. जीवानिशी नाही गेला. किमान आपण कोण आहोत, हे सांगण्याची संधी त्याला मिळाली. शिवाय, गर्दीनं पोलिसांवर विश्‍वास दाखवल्यामुळे पोलिसांनीसुद्धा स्वतःला भाग्यवानच मानले असेल! स्पायडर मॅनची ओळख पटल्यावर मात्र कोणता गुन्हा नोंदवावा, कलम कोणतं लावावं, असे असंख्य प्रश्‍न पोलिसांना पडले. कारण स्पायडर मॅन चोर नव्हता. तो प्रेमवीर होता आणि संबंधित इमारतीत राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला भेटायला तो स्पायडर मॅनसारखा भिंतीवरून, पाइपाच्या आधारानं चालला होता.

हा प्रकार सकाळच्या वेळी घडल्यामुळे कदाचित हा चोर नसावा, असं लोकांना वाटलं असेल. इमारतीच्या दर्शनी भागात सहसा पाइप नसतात. त्यामुळं तो इमारतीच्या मागच्या बाजूनं वर चढत असावा. तरीसुद्धा लोकांनी आपल्याला पाहिलं हे लक्षात आल्यावर त्याची घाबरगुंडी उडाली आणि प्रेयसीच्या घरात न जाता तो थेट गच्चीवर गेला. मग गर्दीचं काम सोपं झालं. सगळे ताबडतोब जिन्यावरून गच्चीकडे धावले. स्पायडर मॅन हाती लागताच प्रत्येकानं इमानदारीत आपापला वाटा उचलला. लोकांचं समाधान झाल्यावर प्रकरण पोलिसात गेलं.

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, असं म्हटलं जात असलं तरी प्रेमिकाला “प्रेमवीर’ म्हटलेलं आम्हाला फारसं आवडत नाही. प्रेम आणि युद्ध यात तेवढा फरक मानायला हवा, असं वाटायचं. आशिक, प्रियकर हे शब्द प्रेम करणाऱ्याला शोभतात; पण “प्रेमवीर’ शब्द उच्चारला की उगीचच बंदूक रोखून प्रेम केल्यासारखं वाटतं. मुंबईतला स्पायडर मॅन पाहता आमचा हा दृष्टिकोन बदललाय. प्रेयसीला भेटायला पाइपच्या आधारानं भिंतीवरून सरपटत जाऊ शकतो, तो वीरच!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)