फडणवीस यांच्या यात्रेला शहा दाखवणार हिरवा कंदील

मोदींच्या उपस्थितीत होणार समारोप

मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेपर्यंत पोहचण्यासाठी महाजनादेश यात्रा काढणार आहेत. त्या यात्रेला 1 ऑगस्ट यादिवशी भाजपचे अध्यक्ष अमित शहा अमरावतीमध्ये हिरवा कंदील दाखवतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्या यात्रेचा समारोप होईल.

तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज होत आहेत. त्यामध्ये राज्य सरकारचे नेतृत्व करणारा भाजपही मागे नाही. निवडणुकीआधी अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचण्याच्या इराद्याने स्वत: फडणवीस पुढे सरसावले आहेत. जनसंपर्क अभियानाचे स्वरूप असणारी त्यांची यात्रा राज्यातील एकूण 288 पैकी 152 विधानसभा मतदारसंघांमधून जाईल.

यात्रेदरम्यान त्यांच्या 104 सभा आणि 200 मेळावे होणार आहेत. राज्याच्या 36 पैकी 30 जिल्ह्यांमधून ती यात्रा 4 हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करेल. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात फडणवीस 1 ते 9 ऑगस्ट या कालावधीत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा करतील. त्यानंतर 17 ते 31 ऑगस्ट या कालावधीत यात्रेचा दुसरा टप्पा होईल. ऑगस्टच्या अखेरीस यात्रेचा समारोप नाशिकमध्ये होण्याची शक्‍यता आहे. मोदींचा वेळ उपलब्ध होण्यानुसार यात्रेच्या समारोपाची तारीख निश्‍चित केली जाईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)