नदी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष “टास्क फोर्स’

– गायत्री वाजपेयी

पुणे – नदी प्रदूषणाची कारणे, प्रदूषित पट्टे, प्रदूषण रोखण्यासाठी आवश्‍यक कृती आराखडा आणि तो राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम या सर्वांचा अभ्यास आणि अंमलबजावणीसाठी राज्य शासनातर्फे जिल्हास्तरीय “स्वतंत्र पर्यावरण संनियंत्रण दलाची’ (स्पेशल एन्व्हारमेंट सर्वेलन्स टास्कफोर्स)ची स्थापना करण्यात आली असून लवकरच यामार्फत नदी प्रदूषण रोखण्यासंदर्भात आवश्‍यक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार, जिल्हा पातळीवर प्रदूषित नदी पट्ट्यातील प्रदूषण रोखण्याकरिता राज्य शासनातर्फे “विशेष टास्कफोर्स’ स्थापन करण्यात आले असून हा प्रयोग पहिल्यांदा पुणे जिल्ह्यासाठी करण्यात आला आहे. एकूण 7 सदस्यांच्या या टास्कफोर्समध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, पोलीस आणि विधीसेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. नुकतीच या टास्कफोर्सची पहिली बैठक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात झाली. यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय लांघी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत, पोलीस उपनिरीक्षक सुजात इनामदार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, नितीन शिंदे, उपेंद्र कुलकर्णी असे टास्क फोर्सचे सर्व सदस्य सहभागी झाले होते. जिल्ह्यातील नद्यांचे सर्वाधिक प्रदूषित पट्टे, त्यासंदर्भात करावयाची कामे आणि समितीच्या पुढील वाटचालीबद्दल चर्चा करण्यात आली.

याबाबत खेडकर म्हणाले, “नद्यांच्या प्रदूषित पट्ट्यामधील प्रदूषण रोखण्यासाठी या विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून प्रभावी काम केले जाणार आहे. तसेच, या उद्दिष्टांच्या पूर्तीसंदर्भातील कामांचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला जाणार आहे.’

टास्कफोर्सची कामे
– सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती मिळवणे
– वाळू उत्खननावर नियंत्रण
– घरगुती, औद्योगिक कचरा, सांडपाणी विल्हेवाटीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी
– नदीकाठावर वृक्षारोपण
– नदी प्रदूषण संदर्भातील जनजागृती

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)