पुणे – महापालिकेकडून रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेले तसेच आर 7 अंतर्गत पालिकेच्या ताब्यात आलेल्या बांधीव व्यावसायिक मिळकती अतिक्रमण विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. अशा सुमारे 600 गाळ्यांची यादी अतिक्रमण विभागास नुकतीच देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे या गाळ्यांचे व्यवस्थापन अतिक्रमण विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
महापालिकेत काही वर्षांपूर्वी अतिक्रमण आणि भूमी जिंदगी (मालमत्ता व्यवस्थापन) विभाग हे एकत्र होते. कालांतराने प्रशासकीय सोयीच्या अनुषंगाने हे दोन्ही विभाग स्वतंत्र करण्यात आले. त्यात, महापालिकेने बांधलेल्या गाळ्यांचे व्यवस्थापन मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत होते. त्यात, या गाळ्यांची देखभाल दुरुस्ती तसेच हे गाळे भाडेकराराने देण्याचे काम पाहिले जात होते. मात्र, प्रत्यक्षात हे गाळे रेडीरेकनरच्या दराने दिले जात असल्याने त्यातून पालिकेस अत्यल्प उत्पन्न मिळत आहे. तसेच त्याचा फारसा वापरही होत नाही. त्याचवेळी अतिक्रमण विभागास शहरात झोड तसेच पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी गाळ्यांची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमण विभागाकडून रस्त्याच्या कडेला असलेले व्यावसायिक गाळे मालमत्ता व्यवस्थापन विभागाऐवजी आमच्या विभागाकडे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, हे सुमारे सहाशे गाळ्यांची यादी अतिक्रमण विभागास देण्यात आली असल्याची माहिती जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सद्यःस्थिती अहवाल करणार
गाळे अतिक्रमण विभागाकडे देण्यात आले असले तरी, त्याच्या कोणत्याही सद्यःस्थितीचा त्यात उल्लेख नाही. यापूर्वी मालमत्ता व्यवस्थापन विभागाने अनेक गाळे भाडेकराराने दिले आहेत. त्याची माहिती या यादीत नाही, तसेच ते चांगले आहेत का, वापरण्या योग्य आहेत का याचीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या गाळ्यांचा सद्यःस्थिती अहवाल अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार असून त्यानंतर जे गाळे वापरण्या योग्य आहेत त्यांचे नियोजन पुनर्वसन तसेच भाडेकराराने देऊन महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी करण्यात येणार असल्याचे जगातप म्हणाले.