बिबवेवाडी, दि. 29 (प्रतिनिधी) –अनाथ, मूक बधिर मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि त्यांच्या खडतर आयुष्यात काही काळ आनंद निर्माण करता आला. हीच खरंतर ईश्वर सेवा आहे, अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण मासारंभाचा शुभारंभ याप्रकारे सेवा करता आला हे माझे भाग्य आहे.., असे प्रतिपादन सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार, अभिनेते संतोष चोरडिया यांनी केले.
रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन आणि आयलीज् डान्स अँड आर्ट ऍकॅडमीच्या वतीने टिंगरेनगर येथील सी.आर.रंगनाथन निवासी विशेष विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “हसरा श्रावण’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केवळ सांकेतिक भाषा, खाणा खुणाच समजणाऱ्या या विद्यार्थ्यांना एकपात्री कलाकार संतोष चोरडिया आणि अभिनेत्री डॉ. कविता घिया यांनी देहबोलीतून विनोदी किश्शांवर या मुलांना खळखळून हसविले तर गायक राजेश शिंगाडे आणि गायिका सोनाली अय्यंगार यांनी “इतनी शक्ती हमे देना दाता, “रुक जाना नहीं तू कही हारके’, “जीवन में कभी डरना नहीं’ अशा गाण्यांच्या माध्यमातून मुलांचे प्रबोधन केले. संगीतकार शैलेश येवले यांनी की बोर्डवर तर विजय भोंडे यांनी ड्रम मशीनवर साथ दिली.
समाजातील दुर्लक्षित विशेष मुलांना हसवून, गाण्यांवर नाचवून, त्यांना प्रेमाची झप्पी देणाऱ्या संतोष चोरडिया आणि टीम जे सत्कर्म करीत आहे त्याला आमचा सलाम. खूप कमी कलाकार अशी सामाजिक बांधिलकी जपतात.
– प्रकाश सदाकळे, संस्था अध्यक्ष, सी.आर.रंगनाथन विद्यालय