रिक्त जागांचा तपशील आज जाहीर होणार : विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत अर्ज करावेत
पुणे – अकरावी प्रवेशाची नियमित तिसरी फेरी पूर्ण होताच शिक्षण विभागाने विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विशेष फेरीसाठी 9 ते 10 ऑगस्ट अशा दोन दिवसांत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील उद्या (दि.9) सकाळी दहा वाजता जाहीर होईल. त्यानुसार अर्ज करावेत, अशी माहिती अकरावी प्रवेश समितीकडून देण्यात आली.
तिसऱ्या फेरीची प्रवेश फेरीची आज मुदत पूर्ण झाली. त्यानंतर ज्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही अथवा अर्जच केला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे.
अर्ज केल्यानंतर दि 14 ऑगस्ट रोजी विशेष फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दि. 16 ते 19 ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
“प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ : प्रवेश 20 ऑगस्टपासून
विशेष फेरीनंतर शिक्षण विभागाकडून अकरावीच्या रिक्त जागांवर गतवर्षीप्रमाणे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ यानुसार प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले असून, ह्या फेरीचे प्रवेश 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, नियमित व विशेष फेरीनंतर “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ह्यानुसार प्रवेश फेरी घेण्यात येऊ नये, अशी विविध विद्यार्थी संघटनांनी मागणी केली आहे.
तिसऱ्या प्रवेश फेरीचे आकडेवारी
प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : 15,851
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : 8,570
प्रवेश नाकारलेले विद्यार्थी : 24
प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी : 77
प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : 7,180
विशेष फेरीसाठी कोण अर्ज करू शकेल
आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी
प्रवेश मिळूनही नाकारलेले विद्यार्थी
आतापर्यंत प्रवेशच घेतला नाही असे विद्यार्थी
पहिले पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी