अपवाद वगळता झगमगाटी दुनियेत पाऊल ठेवणारे खेळाडू आपल्या भूतकाळाचे स्मरण करू इच्छित नाहीत किंवा मग खेळाच्या मैदानावरून निवृत्त झाल्यावरच सामाजिक उत्तरदायित्वाची आठवण त्यांना होते. 23 वर्षांचा फुटबॉलपटू मार्कस रॅशफोर्ड हा सध्या प्रेरणास्रोत बनला आहे.
वेग, क्षमता, स्वतःवरील नियंत्रण आणि समयसूचकता ही कौशल्ये फुटबॉलपटूकडे असली, तर तो प्रेक्षकांना सहसा निराश करत नाही. आपल्या पावलांमध्ये चेंडू खेळवत प्रतिपक्षावर हल्लाबोल करणारा इंग्लंडचा मार्कस रॅशफोर्ड हा असाच एक अत्यंत चपळ आणि कुशल फुटबॉलपटू आहे.
त्याने केलेल्या हल्ल्याचा शेवट बऱ्याच वेळा गोलमध्ये होतो. जगातील नामांकित फुटबॉल क्लबपैकी एक मानल्या जाणाऱ्या मॅंचेस्टर युनायटेड या क्लबचा तो आधारस्तंभ मानला जातो. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली.
गेल्या चार वर्षांत तो आपल्या प्रतिभेमुळे जगभरात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. याच वेगवान कामगिरीमुळे गेल्या वर्षी बीबीसीने त्याला “स्पोर्टस पर्सनॅलिटी ऑफ दि इयर’ हा सन्मान बहाल केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या खेळाव्यतिरिक्त अन्य एका कारणाने चर्चेत आहे.
फुटबॉलपटू सामान्यतः खेळाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात रमलेच तर ते क्षेत्र फॅशनचे तरी असते किंवा जाहिरातींमधून पैसा मिळविण्याचे. परंतु मार्क्सने एका वेगळ्याच क्षेत्रात रस घेतला आहे. गरीब मुलांसाठी अन्नाची व्यवस्था करण्यात तो सध्या मग्न आहे. त्याने सुरू केलेल्या मोहिमेचा परिणाम असा झाला की, ब्रिटनच्या सरकारलाही मागच्या पावलावर यावे लागले आणि त्याचे ऐकावे लागले.
मार्कसचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले. तो आणि त्याचे दोन भाऊ सरकारी शाळेत शिक्षण घेत असत. घरात प्रचंड आर्थिक तंगीचे वातावरण असल्यामुळे दुपारच्या जेवणासाठी ही भावंडे सरकारकडून मिळणाऱ्या आहारावर अवलंबून असत. बऱ्याच काळापर्यंत या आहाराने या भावंडांना मोठा आधार दिला.
भारतात ज्याप्रमाणे सरकार मध्यान्ह आहार योजना सरकारी शाळांमध्ये चालविते, तशीच योजना ब्रिटन सरकारसुद्धा चालविते, हे या निमित्ताने नमूद करावे लागेल. या योजनेचे नाव आहे “फ्री स्कूल मील.’ परंतु गेल्या वर्षी सरकारने शालेय शिक्षणावरील अर्थसंकल्पीय तरतुदीत कपात केली आणि त्याचा परिणाम या योजनेवरही झाला.
ही योजना जवळजवळ बंद पडण्याच्या बेतात आली होती.
ही खबर मार्कस रॅशफोर्ड याला मिळाली. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मार्कसने मोठी मोहीम उघडली. ट्विटर, फेसबुकवर सातत्याने लिहून लोकांचे लक्ष या समस्येकडे वेधले. मार्कसने ही मोहीम उघडल्यानंतर इतरही अनेक नामवंत व्यक्तींनी या मोहिमेत सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला. त्याचा परिणाम असा झाला की, सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
त्यावेळी सरकारने मार्कसचे म्हणणे मान्य केले; परंतु काही महिन्यांपूर्वी सरकारने पुन्हा या योजनेला कात्री लावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याची खबरही मार्क्सला लागली. “फेअर शेअर’ नावाची एक सामाजिक संस्था चालविणाऱ्या मार्कसने पुन्हा एकदा सरकारविरुद्ध दंड थोपटले.
हा मुद्दा त्याने पुन्हा एकदा लावून धरायला सुरुवात केली. स्थानिक खासदारांनी पुढे यावे, अशी विनंती त्याने केली. एवढे करूनही सरकारचा दृष्टिकोन या बाबतीत सकारात्मक नाही असे दिसून येताच मार्कसने लोकसहभागातून शाळांमध्ये भोजनाची उपलब्धता केली जावी, यासाठी मोहीम सुरू केली.
मार्कसच्या या मोहिमेचा दुहेरी परिणाम झाला. लोकांनी मार्कसला मनापासून साथ दिली आणि पाहता-पाहता दोन कोटी पाउंड निधी जमा झाला. दुसरीकडे, ही मोहीम पाहून सरकारनेही मुलांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय आता घेतला आहे.
मार्कसच्या या मोहिमेचे जगभरातून कौतुक होत आहे. गरिबीत लहानाचा मोठा झालेला मार्कस हा काही एकमेव खेळाडू नव्हे. अनेक खेळाडू त्याच्यासारखीच पार्श्वभूमी असणारे आहेत.
मोहंमद अली आणि पेले यांच्यासारखे अपवाद वगळता झगमगाटी दुनियेत पाऊल ठेवणारे खेळाडू आपल्या भूतकाळाचे स्मरण करू इच्छित नाहीत किंवा मग खेळाच्या मैदानावरून निवृत्त झाल्यावरच सामाजिक उत्तरदायित्वाची आठवण त्यांना होते; परंतु 23 वर्षांचा मार्कस आता त्याच्या कारकिर्दीच्या उत्कर्षबिंदूजवळ आहे. अशा अवस्थेत आपला भूतकाळ स्मरणे आणि त्याने आपले सामाजिक उत्तरदायित्व याच वयात निभावणे ही काही साधीसुधी घटना नाही.