महिला PSIच्या कुटुंबावर काळाचा घाला; नवदांपत्यासह चौघांचा मृत्यू

बेळगाव – वास्कोहून इलकला जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसची आय-20 कारला धडक बसून भीषण अपघात झाला आहे. रविवारी दुपारी बेळगाव-बागलकोट रोडवरील चचडी-गोंतमार क्राॅसजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात नवदांपत्यासह महिला पोलीस उपनिरीक्षक आणि इतर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

महिला पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी हणमंतराव नलवडे (पवार) (रा. सह्याद्रीनगर), त्यांचा मुलगा प्रसाद वासूदेव पवार (वय-30), सून अंकिता प्रसाद पवार (वय,27), अंकिता यांची आत्या दीपा अनिल शहापूरकर (वय, 50) अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी नलावडे लग्नानिमित्त सुट्टीवर होत्या. लग्न उरकून त्या घरी परतत असताना सौंदत्ती येथील रेणुका देवीचे दर्शन घेण्याचे नियोजन केले. मात्र, चचडीजवळ पोहोचल्यानंतर कार व बसचा भीषण अपघात झाला. बस कारवर आदळल्याने कारचा चक्काचूर झाला. अपघातात चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला.

चार दिवसांपूर्वीच प्रसाद आणि अंकिता यांचा विवाह सोहळा पार पडला होता. अंगावरील हळद सुकण्याआधीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. कारचा निम्मा भाग बसखाली सापडला होता. त्यामुळे कारमधील चौघे जण चिरडले गेले. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.