पुणे – महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी दि. 8 ते 10 सप्टेंबरदरम्यान, विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. हे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी काढले आहेत. सध्या सुमारे 564 कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित असून त्यातील अनेक प्रकरणे तीन वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहेत
प्रशासकीय दिरंगाईमुळे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना निवृत्तीवेतनासाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. शिवाय, प्रकरणे मार्गी लावण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागण्यात येत आहेत. पैसे न दिल्यास टाळाटाळ केल्या जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.
तसेच प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी मागील आठवड्यात बिनवडे यांनी बैठक बोलावली होती. त्यालाही सर्व विभागप्रमुखांनी दांडी मारली. त्यामुळे संतापलेल्या अतिरिक्त आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना कारवाईच्या सूचना देत या मोहिमेत तातडीने प्रकरणे मार्गी काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या मोहीमेसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ही प्रलंबित प्रकरणे तसेच अधिकारीच अतिरिक्त आयुक्तांच्या बैठकीस गैरहजर राहत असल्याचे वृत्त दैनिक “प्रभात’ने दिले होते.
सर्वाधिक प्रकरणे शिक्षण विभागाकडे
निवृत्ती वेतन प्रकरणात खातेप्रमुख, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पगारपत्रक लेखनिक गांभिर्याने ही प्रकरणे हाताळत नसल्याचा आरोप होत आहे. प्राथमिक शिक्षण विभाग-115, पाणीपुरवठा- 41, आरोग्य विभाग-37 प्रकरणे प्रलंबित आहेत. तर, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय-32, ढोले पाटील रस्ता- 18 तर शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे 19, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाकडे 23 प्रकरणे प्रलंबित आहेत. यात सेवानिवृत्त कर्मचारी भरडले जात आहेत.