मुंबई – राष्ट्रवादीचे नेते व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करोनाची लागण झाली. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. विशेष म्हणजे डॉ. कोल्हे यांनी यापूर्वीच करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तरी देखील त्यांना करोनाची बाधा झाली.
करोना उपचारासाठी अनेक सुसज्ज रुग्णालये उपलब्ध असतानाही त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विश्वास दाखवत शासकीय रुग्णालयाचाच पर्याय निवडला आहे. अमोल कोल्हे म्हणाले कि, ” दोनवेळा करोना प्रतिबंधक लस घेऊन सुद्धा माझी करोना टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे. त्यामुळे करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही याची प्रचिती स्वत: मला आलेली आहे. हा डेल्टा व्हेरीयंट असू शकतो.
कारण तो लस घेतल्यानंतरची प्रतिकारशक्ती सुद्धा भेदू शकतो. महाराष्ट्र शासनाची आरोग्य व्यवस्था सक्षम असून माझा त्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी करोना उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या ‘सेव्हेन हिल्स रुग्णालयात’ उपचारासाठी दाखल झालो आहे.
लसीचे दोन डोस घेतले म्हणजे धोका टळला असे समजून गाफिल राहू नका. सर्वांनी करोनाचे नियम निर्बंध काटेकोरपणे पाळा. असे कळकळीचे आवाहन अमोल कोल्हे यांनी आपल्या हितचिंतकांना केले.