बार्सिलोनाला टाकले पिछाडीवर, विजेतेपदाचे दावेदार
बार्सिलोना – स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत रेयाल माद्रिदने आल्वेसचा सहज पराभव केला व बार्सिलोनाला गुणतालिकेत पिछाडीवर टाकत विजेतेपदाची दावेदारी आणखी भक्कम केली. या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात रेयालने आल्वेसचा 2-0 असा सहज पराभव केला व गुणतालिकेत 80 गुणांची नोंद करत अग्रस्थान मिळवले. बार्सिलोना या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, रेयालने त्यांची मक्तेदारी मोडून काढताना यंदाच्या स्पर्धेचे विजेतेपद आपणच पटकावणार असल्याचे चित्र निर्माण केले.
आल्वेसविरुद्धच्या सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर करिम बेन्झेमाने 11 व्या मिनिटालाच गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याने फिल्ड गोल करताना काही चुका केल्या मात्र त्यानंतर मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत आपली चूक दुरूस्तही केली. पहिला हाफ संपुष्टात आला तेव्हा ते 1-0 असे आघाडीवर होते. त्यानंतर दुसरा हाफ सुरू झाला व लगेचच मार्कोस असेन्सियो याने 51 व्या मिनिटाला गोल केला व संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. या गोलमध्येही बेन्झेमाने सर्वोत्तम पास दिल्याने मार्कोसला गोल करता आला.
या स्पर्धेच्या आता केवळ तीन फेऱ्या बाकी असून बार्सिलोनाने उर्वरित सामने जिंकले तरच त्यांनाही विजेतेपदाची संधी मिळेल. मात्र, सध्याचा रेयालचा खेळ पाहता विजेतेपदावर त्यांचीच दावेदारी असल्याचे स्पष्ट होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 19 जुलै रोजी होणार असून त्यापूर्वी दोन्ही संघांना तीन सामने खेळायला मिळणार आहेत. रेयलाने बार्सिलोनावर 4 गुणांची आघाडी घेतली असून पुढील सामन्यात किमान दोन विजय मिळवले तरीही त्यांचे विजेतेपद निश्चित होणार आहे.