स्मार्ट प्रभागातील रस्त्यांवर सुसाट खर्च

केंद्राचा 255 कोटींचा निधी : महापालिकेच्या तिजोरीतूनही उधळपट्टी
पिंपळे गुरवमधील रस्त्यांसाठी पालिकेकडून 21 कोटींचा खर्च 

पिंपरी – स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मॉडेल वॉर्ड म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरातील रस्त्यांसाठी 255 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मिळणार आहे. पूर्वीच्याच विकसित प्रभागांचा “स्मार्ट सिटी’त समावेश करीत या योजनेच्या मूळ उद्देशाला सत्ताधारी व महापालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे. अशातच आता महापालिकेच्या तिजोरीतूनही रस्ते विकासाच्या नावाखाली खर्चाचा रतीब सुरू केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एरिया बेस डेव्हलमेंटमध्ये पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागाचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत 22 किलोमीटरचे रस्ते, सेवा वाहिन्या, फुलपाखरू उद्यान, योगा पार्क आदी कामे करण्यात येणार आहेत. सुमारे 320 कोटींचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 22 किलोमीटरच्या रस्ते विकासावर 255 कोटी रुपये खर्च होणार आहेत. यामध्ये पिंपळे गुरव भागात 13.2 किलोमीटरचे 28 तर पिंपळे सौदागर मध्ये 8.8. किलोमीटरचे 26 रस्ते विकसित करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निविदांना मंजुरी देण्यात आली होती. तर निवडणुकीनंतर कामाचे आदेश देण्यात आले होते. या रस्ते विकासासाठी 255 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मिळणार आहे. असे असतानाही विशेषतः भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरव भागातील रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर खर्चाचा रतीब सुरु आहे.

एकाच ठेकेदाराला काम
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पिंपळे गुरवमधील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 21 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये गुलमोहर कॉलनी रस्त्यासाठी 12 कोटी 2 लाख रूपये, सुदर्शननगर, जवळकरनगर, महाराष्ट्र कॉलनी भागातील रस्त्याच्या कामासाठी 11 कोटी 94 लाख रूपयांच्या खर्चाचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आयत्यावेळच्या प्रस्तावाद्वारे या निविदा खर्चाला मंजुरी देण्यात आली. यापूर्वी हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. सेवा वाहिन्यांसाठी खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरु असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. असे असताना ही घाई कशासाठी असा प्रश्‍न करदात्यांना पडला आहे.

“स्मार्ट सिटी’तील “एरिया बेस डेव्हलपमेंट’ अंतर्गत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर भागातील मुख्य 54 रस्ते अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येत आहेत. एकीकडे मुख्य रस्ते स्मार्ट सिटीच्या निधीतून विकसित करण्यात येत असताना अंतर्गत रस्ते देखील विकसित करणे गरजेचे आहे. हे रस्ते महापालिकेच्या खर्चातून विकसित करण्यात येणार आहेत.

– विजय भोजने, उपअभियंता, महापालिका.

पिंपळे गुरव मधील गुलमोहर कॉलनी आणि सुदर्शननगर भागातील रस्ते विकासासाठी महापालिकेने स्वतंत्रपणे निविदा मागविल्या होत्या. या दोन्ही कामांकरिता चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी अजवानी इन्फ्रास्ट्रक्‍चर या ठेकेदाराने दोन्ही कामांसाठी निविदा दरापेक्षा 13.99 टक्के कमी दराने निविदा सादर केल्याने महापालिका आयुक्‍तश्रावण हर्डीकर यांनी या कामांची निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे अजवानी इन्फ्रास्ट्रक्‍चर यानांच हे काम देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.