दोन तासांत 108 मिलीमीटर पाऊस : शिवगंगा नदीला महापूर ; 15 जण गेले वाहून
कापूरहोळ – भोर तालुक्यातील ससेवाडी, गोगलवाडी, शिंदेवाडी परिसरातील डोंगरमाथ्यावर बुधवारी (दि. 25) रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान ढगफुटी झाल्याने शिवगंगा नदीपात्राला पूर आला. यामुळे खेड शिवापूर दर्ग्यालगत असणाऱ्या कुटुंबातील अंदाजे तीन जण व 12 फकीर वाहून गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. दोन तासांत 108 मिलीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे परिसरातील वीज, मोबाइल सेवा खंडीत झाली होती. मुसळधार पावसामुळे नदी काठच्या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुणे-सातारा महामार्गावर रात्री ठिकठिकाणी वाहतूक बंद होती.
शिवगंगा खोऱ्यातील खेड शिवापूर (ता. हवेली) परिसरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे खेड शिवापूर येथील प्रसिद्ध दर्ग्यालगत असणाऱ्या एका कुटुंबातील तीन जण व पुलाशेजारील शेडमधील अंदाजे 12 फकीर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. बुधवारी रात्री दोन मृतदेह सापडले असून गुरुवारी सकाळी आणखी एक मृतदेह सापडला आहे.
वेळू मंडल परिसरातील ससेवाडी, गोगलवाडी, शिंदेवाडी परिसरात झालेल्या पावसामुळे शिवगंगा नदीला पूर आला होता. पावसामुळे रांज, खोपी, कुसगाव गावचा संपर्क तुटला असून, शेतातील माती, दगडी बांध, कठडे, उभी पिके, विजेचे पोल, डिपी, शेड व वाहने वाहून गेल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
केळावडे व साळवडे गावात झालेल्या पावसामुळे शिवगंगा नदीकाठच्या परिसरातील तीन गुरे, शेतातील उभी पिके व झाडे वाहून गेली आहेत. कापूरहोळ, किकवी मंडलमधील दिवळे केतकावळे परिसरात 132 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. यामुळे दिवळे, कापूरहोळ गावच्या स्मशानभूमीचे मोठे नुकसान झाले आहे तर किकवी येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या जोड पुलाचा भराव वाहून गेला आहे. तर कामथडी गावातील अनेक घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच रस्तेही उखडले आहेत.
पुणे-सातारा महामार्गवर खेडशिवापूर येथे पुलावर पाणी आल्याने रात्री दोन तास वाहतूक बंद होती. खोपी, कुसगाव, केळावडे, साळवडे या दरम्यान असलेला पूल काही प्रमाणात पडला असल्याने तेथील गावाचा संपर्क तुटला होता. महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत आहेत.
– अजित पाटील, तहसीलदार