लखनौ -समाजवादी पक्षाने (सप) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशात कॉंग्रेसला ११ जागा देऊ केल्या आहेत. तसेच, कॉंग्रेससाठी सोडण्यात येणाऱ्या जागांमध्ये वाढ होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. आता सपने ठामपणे मांडलेल्या प्रस्तावावर कॉंग्रेस काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.
इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीचे प्रतिनिधित्व उत्तरप्रदेशात सप, कॉंग्रेस आणि राष्ट्रीय लोक दल (रालोद) हे पक्ष करतात. सप आणि रालोदमध्ये याआधीच जागावाटपाविषयी सहमती झाली.
त्यानुसार, रालोद ७ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक ८० जागा आहेत. कॉंग्रेस आणि रालोदला मिळून सपने १८ जागा देऊ केल्या आहेत.
आता उर्वरित ६२ जागा स्वत: लढवणार असल्याचे सूतोवाच सपने केले आहे. कॉंग्रेस आणि सपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याचे वृत्त याआधीच प्रसिद्ध झाले होते. आता सपने जागांबाबत एकतर्फी प्रस्ताव मांडला की जागावाटपावर दोन्ही पक्षांत सहमती झाले ते तातडीने समजू शकले नाही.
कॉंग्रेसला दिलेल्या प्रस्तावाची माहिती सपने उघड केल्यानंतर त्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावरून भूमिका मांडली. कॉंग्रेस समवेत ११ मजबूत जागांच्या माध्यमातून आमच्या सौहार्दपूर्ण आघाडीची चांगली सुरूवात होत आहे.
ते सत्र विजयाच्या समीकरणासह आणखी पुढे जाईल. इंडियाची टीम आणि पीडीएची रणनीती इतिहास बदलून टाकेल, असे त्यांनी म्हटले. सपने मागास, दलित आणि अल्पसंख्याकांवर (पीडीए) अधिकाधिक भर देण्याची रणनीती अवलंबली आहे.