लखनौ – मऊ जिल्ह्यातील घोसी येथील समाजवादी पक्षाचे आमदार दारा सिंह चौहान यांनी शनिवारी उत्तर प्रदेश विधानसभेचा राजीनामा दिला. विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीप दुबे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, चौहान यांनी आपले राजीनामा पत्र सभापती सतीश महाना यांच्याकडे सुपुर्द केले आहे.
राजीनामा पत्रात चौहान यांनी राजीनाम्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. चौहान हे पूर्वीच्या योगी अदित्यनाथ यांच्या सरकार मध्ये मंत्री होते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला होता.
त्यांनी बहुधा पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा, असे सांगितले जात आहे, पण त्याविषयी त्यांनी अधिकृतपणे कोणतीही वाच्यता केलेली नाही. त्यांच्या राजीनाम्यावर समाजवादी पक्षानेही कोणतेही भाष्य केलेले नाही.