हैदराबाद – दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डिक्रूझ हिचा शुक्रवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. होळी साजरी करून घरी परतत असताना हैदराबादच्या गचिबोवली परिसरात अनियंत्रीत कार दुभाजकावर आदळली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री गायत्री आणि तिचा मित्र होळी साजरी करून परतत होते. यावेळी गचिबोवली परिसरात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली. या भीषण दुर्घटनेत गायत्रीचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
गायत्रीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत चांगले नाव कमावले होते. ‘मॅडम सर मॅडम अंते’ या वेब सीरिजमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ती खूप चर्चेत आली होती.