विश्रांतवाडी – पुणे शहरातील एका धनाढ्य व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने रविवारी रात्री कल्याणीनगर येथे दोन निष्पाप तरुणांना भरधाव पोर्शे कारची धडक देऊन चिरडले. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाने शास्त्रीनगर चौक ते येरवडा पोलीस स्टेशनपर्यंत मुक मोर्चा काढला. पोलिस स्टेशनपुढे ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सदर गुन्हेगाराला कठोर शासन करण्याऐवजी पिझ्झा खायला देत त्याचे आदरातिथ्य केले. त्यामुळे प्रशासनाकडून झालेल्या तकलादू कार्यवाही व वडगांव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी केलेल्या हस्तक्षेपाचा निषेध केला.
यावेळी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रवक्ते मुकुंद किर्दत , पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पुणे शहर युवाध्यक्ष अमित म्हस्के, संघटन मंत्री एकनाथ ढोले, प्रवक्ते किरण कद्रे, उपाध्यक्ष निलेश वांजळे, महासचिव अक्षय शिंदे, सतिष यादव, उपाध्यक्ष अनिल कोंढळकर, संघटन मंत्री मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, उपाध्यक्ष हारून मुलानी, रिक्षा आघाडी अध्यक्ष अनिल धुमाळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, पुण्यामध्ये मद्य विक्री करण्यासाठी हॉटेल इतकी उशिरा पर्यत कोणाच्या वरदहस्ताने सुरु असतात? अशा उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल व्यवसाईकावर पोलीस प्रशासन कारवाई का नाही करत? रात्री गस्त घालणारे पोलिसांचे भरारी पथक काय करते? पोलिसांचे काही आर्थिक हितसंबंध ह्यात आहेत का? तसेच सदर अपघात झाल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे देखील पोलीस चौकीत वेदांत अगरवाल ह्याच्यावरील कारवाई वेळी उपस्थित असल्याने उद्योजक व राजकारणी ह्यांचे हितसंबंध पुढे येत आहेत.
वास्तविक पाहता पोलीस तपास तसेच गुन्हा नोंदविला जात असताना त्यांच्या उपस्थितीची गरज तिथे का लागली? याची माहिती पोलीस प्रशासनाने नागरिकांना द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
“कल्याणीनगर येथे अपघातात झालेली घटना काळजाला घर करणारी आहे, एका उद्योगपती च्या मुलाला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कशी काम करते. पोलिस प्रशासन, आमदार, यांनी केलेली सारवासारव ही संशयास्पद आहे. वडगावशेरी मतदारसंघात यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. त्यावेळी आमदार सुनील टिंगरे एवढ्या तत्परतेने उपस्थित राहिल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही. आमदारांनी या दुर्दैवी घटनेला कारणीभूत असणाऱ्याची पाठराखण केली,ही बाब निषेधार्ह आहे.त्यामुळे आमदारांचे फ़ोन रेकॉर्डिंग, पोलिस स्टेशन मधील फुटेज तपासले जावे. त्यावर सखोल अशी चौकशी करावी” -अमित म्हस्के ( युवा शहराध्यक्ष पुणे शहर )
“विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर हि ओळख असलेले पुणे आता अवैध पब शहर हि बनत आहे.पुण्यातील दुर्घटनेतील बळी अतिशय धक्कादायक घटना आहे.पैश्याच्या जोरावर आरोपींना वाचवण्यासाठी यंत्रणेने जी तत्परता दाखवली, ते वास्तव महाराष्ट्रासाठी, पुण्यासाठी घातक आहे” – अजित फाटके पाटील, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य
“पुण्यातील दोन आयटी इंजिनियर्स चा दुर्दैवी मृत्यू दुर्घटना ही भाजप च्या नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आणि गृहमंत्र्यांनी यांच्या अवैध्य धंद्यातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. संपूर्ण देश भर भाजप भगवान श्री रामाच्या नावाने मत मागते पण वास्तवात भाजप चा एक नेता त्यांना आचरणात आणत नाही. पुण्यातील वाढलेली गुंडगिरी, पब, रेस्टोबार ही संस्कृती भाजप ने वाढवली आहे.” – सुदर्शन जगदाळे, पुणे शहराध्यक्ष आप