दक्षिण-आफ्रिकेचा भारतावर ९ गडी राखून दणदणीत विजय

बंगळुरू – दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी-कॉकने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारताचा ९ गडी राखून पराभव केला आहे. या पराभवामुळे भारताचे आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. भारताने विजयासाठी १३५ धावांचे आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केले. डी-कॉकने नाबाद ७९ धावा केल्या. १७ व्या षटकातच आफ्रिकेने सामन्यात बाजी मारली.

दरम्यान, तीन टी-२० सामन्यांची ही मालिका अखेरीस १-१ अशा बरोबरीत सुटली आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या तिसऱ्या सामन्यवर देखील पावसाचे सावट होते, मात्र सुदैवाने पावसाने हजेरी लावली नाही. डी-कॉक आणि हेंड्रिग्ज यांनी पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. दोघांनीही भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विशेषकरुन डी-कॉकने दमदार फटकेबाजी केली. हेंड्रिग्ज २८ धावांवर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर डी-कॉकने बावुमाच्या साथीने आफ्रिकेच्या डावाला सावरत विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताची फलंदाजांनी आजच्या सामन्यात कामगिरी चोख बजावली, मात्र गोलंदाजांनी निराशा केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीय डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. मात्र रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. ब्युरेन हेंड्रिग्जच्या गोलंदाजीवर रोहित झेलबाद होऊन माघारी परतला. दुसऱ्या बाजूने शिखर धवनने संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत शिखरने २५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावा केल्या. मात्र, उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखर झेलबाद होऊन माघारी परतला.

त्यानंतर रबाडाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याचा प्रयत्न करताना विराट सीमारेषेवर फेलुक्वायोकडे झेल देत माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या आणि ऋषभ पंत यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र फोर्टेनने एकाच षटकात दोघांचे बळी घेतले. शेवटच्या रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याच्या जोडीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारताला १३४ धावांचा टप्पा गाठून दिला. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने ३, फोर्टेन, आणि ब्युरेन हेंड्रिग्जने २ तर तबरेज शम्सीने १ बळी घेतले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.