नवी दिल्ली – बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणात फॉरेन्सिक पुरावे जमा करण्याची नेमकी प्रक्रिया कशी असावी या संबंधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मार्गदर्शक तत्वे म्हणजेच एसओपी जाहीर केली आहे. ( SOP for forensic evidence collection in sexual assault cases ) वैद्यकीय आणि कायदेशीर तज्ज्ञांशी चर्चा करून ही एसओपी म्हणजेच स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चीत करण्यात आली आहे.
अशा प्रकरणातील आरोपींना कोर्टात शिक्षा व्हावी आणि ती प्रकरणे कोर्टात साबित व्हावीत यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध होण्यासाठी अनेक प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांचेही पुरावे कोर्टात हजर करावे लागतात. हे पुरावे गोळा करताना नेमकी काय दक्षता घ्यावी याच्या सुचना यात निश्चीत करण्यात आल्या आहेत.
अनेक बलात्कार प्रकरणांमध्ये संबंधीत व्यक्तींची वैद्यकीय चाचणी घेण्यास झालेल्या विलंबाचा किंवा पुराव्यातील त्रुटींचा लाभ आरोपींना होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत त्यामुळे त्याची दखल घेऊन मानवाधिकार आयोगाने ही उपाययोजना केली आहे.
आयोगाने म्हटले आहे की तपास काम आणि पुरावे गोळा करण्याच्या संबंधात आम्ही जी एसओपी जारी केली आहे ती पुर्णपणे पाळली गेल्यास त्याचा बऱ्याच प्रमाणात उपयोग होऊ शकणार आहे. ही एसओपी मानवाधिकार आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे ती सर्वांनाच पहाण्यासाठी उपलब्ध आहे.