जीवनगाणे: छंद लावून घ्या

अरुण गोखले                                                                                                              जीवनातला खरा आनंद आणि मानसिक समाधान हे अनुभवायचे असेल, तुमचे जीवनगाणे सुरेल करायचे असेल तर एक करा, तुम्ही प्रयत्नपूर्वक तुमच्या जीवाला कोणता ना कोणता तरी छंद लावून घ्या, असं प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी म्हटले आहे. छंद मग तो कोणताही असू दे. कोणत्याही कलेची साधना ही छंदातूनच जन्म घेत असते. गाणं म्हणण्याचा छंद, आवड ही आपल्याला चांगले गाणे ऐकायला, शिकायला आणि म्हणायला त्या सुरांचा गोड अस्वाद घ्यायला प्रवृत्त करते. लेखनाचा छंद तुम्हाला कळत नकळत वाचायला आणि विचार करायला प्रवृत्त करतो. मनातले विचार प्रभावी शब्दांत समोरच्यांपुढे मांडण्यासाठी तुम्ही शब्दांचा, भाषेचा अभ्यास सुरू करता. तुम्ही तुमच्या मनातील विचार भाव भावना ह्यांना शब्द माध्यमातून वाट मोकळी करून देऊ शकता.

वाचनाच्या छंदापायी तुम्ही इतरांच्या भावविश्‍वाशी जोडले जाता. तुमचा वाचनाचा छंद तुम्हाला नव्या भाषा शिकायला, त्यातील शब्दांची, कल्पनांची ओळख करून घ्यायला प्रेरित करतो. त्या शब्दांचे बोट धरून तुम्हाला लेखकाच्या, त्याच्या लेखन कलाकृतीतील पात्रांच्या अंतरंगापर्यंत पोहोचता येते. त्यांच्या सुखदु:खाशी समरस होता येते.

चित्रकलेसारखा छंद तुमचं रंग, रूप नानाविध आकार यांच्याशी नाते जोडतो. रंग तुमच्याशी भावनिक जवळीक अन्‌ संवाद साधतात. तुमचं चित्र इतकं बोलकं होतं की अनेक शब्द वापरूनही नेमकेपणाने जे सांगता येणार नाही, ते एक चित्र किंवा तुमचा कॅनव्हासवरचा एक रंगाचा फटकारा सांगून जातो. ही कला तुमच्याही जीवनात नवे रंग भरते.

वादन, नृत्यासारख्या कला तुम्हाला सातत्य, चिकाटी शिकवून जातात. तसेच खेळाचा छंद तर तुम्हाला जीवनात उपयोगी पडतील अशा कितीतरी गोष्टी शिकतो. उदा. मैत्री, सहकार्य, संयम, सातत्य, मेहनत, प्रसंगी पराभव पचविण्याची शक्‍ती आणि खचून न जाता पुन्हा उभे राहण्याचे मनोबलही तुम्हाला खेळातूनच मिळत असते. कोणतीही कला स्वत:ला त्यासाठी झोकून दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. तुमची कला, छंद हा तुमचे जीवन बदलून टाकतो. आपल्याला जगण्याची ऊर्जा देऊन जातो. त्यासाठी आपण एकच करायला हवे, एखादा तरी छंद हा जपायला हवा आणि सुखासमाधानाच्या आनंदाच्या झुल्यावर झुलायला हवे.

Leave A Reply

Your email address will not be published.