इस्लामपूर – दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्याचा खून करणारा मुलगा लक्ष्मण हरी पाटील – वाघमारे (वय ३० रा. चिकुर्डे )याला न्यायालयाने जन्मठेप व पाचशे रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर सी. मुनघाटे यांनी ही शिक्षा सुनावली.
लक्ष्मण याच्या हल्लात वडील हरी कोंडीबा पाटील – वाघमारे (वय ८१) यांचा मृत्यू झाला होता. चिकुर्डे (ता. वाळवा ) येथे हा प्रकार घडला होता. याबाबत माहिती अशी, चिकुर्डे येथील लक्ष्मण पाटील – वाघमारे याला दारूचे व्यसन होते. तो काही एक कामधंदा करीत नव्हता. दारूसाठी पैसे मागून वारंवार आई – वडिलांशी भांडण करीत असे.
लक्ष्मण याने दारू व चैनीसाठी घरातील म्हैस विकली होती. त्याचे पैसे घरी होते. या पैशांसाठी लक्ष्मण याने वडिलांकडे तगादा लावला होता. यावरूनच शुक्रवार ता.१९ रोजी जुलै २०१९ रोजी वडील हरी व मुलगा लक्ष्मण यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात लक्ष्मण याने लाकडी दांडक्याने वडिलांवर जोरदार हल्ला चढविला.
या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. पोलिस पाटील सुधीर कांबळे यांना हा मारहाणीचा प्रकार समजल्यानंतर ते हरी यांच्या घरी गेले. त्यावेळी ते बेशुध्द अवस्थेत होते. त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस, तोंंडावर, पाठीवर, गंभीर जखमा झाल्या होत्या. पोलिस पाटील कांबळे यांना तागाबाई यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.
यानंतर हरी पाटील यांना कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणी मुलगा लक्ष्मण याच्यावर कुरळप पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पोलिस पाटील सुधीर कांबळे यांनी फिर्याद दिली.
कुरळप पोलिसांनी इस्लामपूर येथील न्यायालयात लक्ष्मण पाटील याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. या केसमध्ये सरकारी पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मुलाची आई, तसेच पंच वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार अरविंद काटे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
जिल्हा सरकारी वकील विनय मधुकर कुलकर्णी यांनी आरोपीच्या कृत्यामुळे मयत हरी कोंडीबा पाटील यांचा वयाचे ८१ व्या वर्षी मृत्यू झाला. आरोपीने निर्दयीपणे स्वत:च्या वडीलांचाच खून दारूच्या व्यसनापोटी केला. ही बाब सामाजिक दृष्टीकोनातून अतिशन हिनपातळीची आहे.
यामुळे आरोपीला कोणत्याही प्रकारची दया दाखवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आरोपीला जन्मठेप व्हावी, असा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद ग्राहय धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश शेखर मुनघाटे यांनी आरोपीला भा.द.वि.स.क.३०२ प्रमाणे जन्मठेप व पाचशे रूपये दंड व दंड न भरलेस सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सहा. सरकार वकील विनय कुलकर्णी यांनी काम पाहिले. सहा. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे, कुरळप पोलिस ठाणेचे कोर्ट कर्मचारी संदीप पाटील, शरद पाटील यांनी सरकार पक्षास मदत केली.