हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमधून पळून जाण्याच्या आरोपाखाली हॉंगकॉंगच्या 10 रहिवाशांवर चीनमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. दक्षिण चीनमधील शेन्झेन शहरात या सर्वांवर खटला चालवला जात आहे. हॉंगकॉंगमधून स्पीडबोटीतून तैवानला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना या 10 जणांना थांबवण्यात आले होते.
त्यांची स्पीडबोट चीनच्या सागरी हद्दीत शिरल्यावर त्यांना थांबवण्यात आले होते. बेकायदेशीरपणे देशाची सीमा ओलांडण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने हे सर्वजण तैवानला जात होते, असा संशय चीनी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या स्पीडबोटीमध्ये दोन अल्पवयीनांचाही समावेश होता. त्यांच्यावर स्वतंत्रपणे खटला चालवण्यात येणार आहे. या सर्व 12 जणांची सुटका करण्यात यावी, यासाठी अमेरिकेच्या दूतावासाठी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे रदबदली करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र चीनच्या न्यायपालिकेच्या सार्वभौमत्वामध्ये हस्तक्षेप असल्याचे सांगून ही मागणी धुडकावून लावण्यात आली. या 10 जणांवरील खटल्याच्या सुनावणीची पहाणी करण्याची परवानगीही अमेरिकेच्या दूतावासाने मागितली होती. मात्र ती परवानगीही नाकारण्यात आली. या 10 जणांवर होत असलेल्या कारवाईबद्दल ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.