पाडव्या दिवशी जेजुरीत सोमवती यात्रा

पालखी मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी

जेजुरी – महाराष्ट्रचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी (दि. 28) दिवाळी पाडवा दिवशी साजरी होत आहे. पहाटे 3 वाजता जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार असून, सकाळी 7 वाजता कऱ्हा नदीवर उत्सव मूर्तींना विधिवत स्नानाचा विधी होणार आहे.

सोमवती यात्रेच्या तयारीसाठी बुधवारी (दि. 23) ग्रामस्थ मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्रचे कुलदैवत असून, वर्षाकाठी देवाच्या आठ यात्रा जेजुरीत भरतात. सोमवारी पहाटे 3 वाजता जेजुरी गडावरून पालखी सोहळा सुरू होऊन सकाळी 7 वाजता कऱ्हास्नान होणार आहे. दुपारी बारापर्यंत हा सोहळा गडावर पोहोचेल, असे देवाचे मानकरी राजेंद्र पेशवे यांनी सांगितले.

या सोहळ्यासाठी आवश्‍यक त्या सुविधा देवसंस्थानच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रमुख विश्‍वस्त ऍड. अशोक संकपाळ यांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदी मार्गावर मोठे खड्डे पडले असून, चिखलही मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्यामुळे कोणतीही वाहने सोडली जाणार नाहीत. जेजुरीतून पालखी मार्गावर वाहने न आणता ती आठवडे बाजार परिसरात लावावीत, तसेच कोथळेकडून येणारी वाहने तेथील शाळेजवळ लावावीत, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.

या बैठकीसाठी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, पदाधिकारी राजेंद्र पेशवे, रमेश राऊत, अरुण खोमने, सुशील राऊत, पंडित हरपळे, राजाभाऊ खाडे, रामदास राऊत, काशीनाथ मोरे, जलिंदर खोमने, देवसंस्थानचे विश्‍वस्त अशोक संकपाळ, शिवराज झगडे, संदीप जगताप, राजकुमार लोढा, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, माजी विश्‍वस्त सुधीर गोडसे, नितीन राऊत, जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंकुश माने, रवींद्र खोमणे, रोहिदास माळवदकर, अविनाश झगडे, अशोक सकट, माणिक पवार, कृष्णा कुदळे, दिलावर खान, दिलावर मनेर व ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.