मांजरी : महाराष्ट्र पार्लर सलून असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी त्यांच्या काही समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
मुंबई येथील गांधी भवन या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोमनाथ काशिद यांनी बारा -बलुतेदार तसेच ओबीसीतील काही सहकारी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात,मंत्री के.सी.पाडवी,माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,नाभिक समाजाचे जेष्ठ नेते सरचिटणीस प्रकाश सोनवणे आदीजण उपस्थित होते.
आज मी माझा राजकीय प्रवास काँग्रेस पक्षात प्रवेश करून सुरू केला. जमिनीवर राहून कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला मोठा न्याय दिला आहे. यापुढे ही राज्यभरातील नाभिक समाज व बारा- बलुतेदार तसेच ओबीसीतील वंचित शोषित मागासलेल्या समाज घटकांसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत राहणार,अशी भावना सोमनाथ काशीद यांनी यावेळी व्यक्त केली.