पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील काही दुय्यम निबंधक कार्यालये नव्या जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. शहरातील अनेक कार्यालयांत दस्त नोंदणीसाठी दररोज शेकडो नागरिक येत असतात. राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या या कार्यालयांत मुलभूत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड येथील कार्यालय नव्या जागेत स्थलांतरीत होत असून सर्व सुविधांनी युक्त अशा नव्या जागेत मार्च अखेर हे कार्यालय स्थलांतर होणार आहे. तर, उर्वरित कार्यालयेही लवकरच कात टाकणार आहेत.
राज्य सरकारला वस्तू व सेवा करानंतर (जीएसटी) सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क लागते.
मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळतो.मात्र, चिंचवड येथील कार्यालयात दस्त नोंदविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यास पुरेसी जागा, अपुरे वाहनतळ, महिलांसाठी वेगळे स्वच्छतागृह नाही. त्यामुळे कामानिमित्त येमाऱया नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मनस्तापाला सामोरे जावे लागते.
चिंचवड येथील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक १८ आणि २६ ही कार्यालये पिंपरी वाघेरे येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. पिंपरी वाघेरे येथील म्हाडाच्या संकुलातील पहिल्या मजल्यावरील चार गाळे भाडेतत्त्वार घेण्यात आली आहेत. मार्च अखेर तेथे ही कार्यालये स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. ही जागा कायमस्वरुपी विकत घेण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या पुढे नागरिकांना सुसज्ज प्रतीक्षा कक्ष, स्वच्छतागृह, पाणी आदी सुविधा मिळणार आहेत.