पुणे: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देताना शिक्षक संघटनेचे पदाधिकारी.
शिक्रापूर -पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या लवकरात लवकर सोडवा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटनेच्या पदाधिकार्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांना निवेदन देत केली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अनेक समस्या प्रलंबित असल्याने नुकतीच महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटनेच्या पदाधिकार्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण व उपशिक्षणाधिकारी संजय काळे यांची भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटने राज्याध्यक्ष अनिल पलांडे, जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे, सरचिटणीस वसंतराव कामथे, जिल्हा कोषाध्यक्ष श्यामराव इंदोरे, दौंड तालुकाध्यक्ष उमेश देशमुख, खेड तालुका कोषाध्यक्ष तुषार वाटेवर, प्रसिद्धीप्रमुख अशोक सावंत, सतिश भालचिम, काशिनाथ डफळ, लहू घोडेकर यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रथम पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला जाईल असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी शिक्षक पदाधिकार्यांना दिला आहे.
या आहेत मागण्या
डिसेंबर अखेर अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून रिक्त मुख्याध्यापक पदे पदोन्नतीने भरावी, केंद्रप्रमुख पदोन्नती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून पदोन्नतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासन आदेशानुसार एक वेतनवाढ देण्यात यावी, प्रलंबित फंड प्रस्ताव मंजूर होऊन रक्कम मिळावी, वरिष्ठ निवड श्रेणी व स्थायित्व तसेच मुख्याध्यापक वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव मंजुर करावे, वेल्हे तालुक्यातील शिक्षण सेवक पूर्ण झालेल्या शिक्षकांचे नियमित वेतन फरक मिळावे, मंजूर वैद्यकीय बिलांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, बॅकडेटेड एमडीएम भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ द्यावी यांसह आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.