कुलगाम :- जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून भारतीय लष्कराचा एक जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. कुलगाम जिल्ह्यातील अष्टल भागात राहणारा जावेद अहमद वानी शनिवारी संध्याकाळी बेपत्ता झाला आहे.
वानी लडाख भागात तैनात होता आणि सध्या तो रजेवर होता. शनिवारी संध्याकाळी वानीची कार पर्नहॉल परिसरामध्ये सापडली. आता बेपत्ता जावेद वानीचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.
शनिवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास जवान काही सामान घेण्यासाठी आपल्या अल्टो कारमधून बाजारात गेला होता. त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.
बाजारपेठेजवळ त्यांची अल्टो कार आढळून आली असून त्यात रक्ताचे डाग आढळून आले. या जवानाच्या शोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. जवानाच्या वडिलांनीही काही जणांवर संशय व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रीय रायफल्सनेही या जवानाच्या शोधासाठी जवळपासच्या गावांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे, जेणेकरून जवानाचा काही मागमूस सापडू शकेल.