परभणी – शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादीतसुद्धा अजित पवारांनी शिंदेच्या पावलावर पाऊल ठेवत बंडखोरी करत भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आता शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप सोबत असून, आगामी निवडणूकदेखील तीनही पक्ष एकत्रच लढवणार असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी,
आगामी 2024च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील, असे वक्तव्य परभणीच्या पाथरीतील एका सभेत केले आहे.
भाजपकडून “घर चलो’ अभियान राबवले जात असून, यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी पाथरी शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी भेट घेत संवाद साधला. दरम्यान, यावेळी त्यांची सभादेखील झाली. ज्यात त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
यात बोलताना ते म्हणाले की, बदलत्या राजकीय गणितात आता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची महायुती आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपणही घड्याळ चिन्हाचा प्रचार करणार आहोत. भाजपला दिलेले मत विकासरुपाने परतफेड करण्याचा भाजपचा संस्कार आहे.
तर आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हेदेखील कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील. मागील नऊ वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकोपयोगी केलेली कामे पाथरी मतदारसंघातील 60 हजार घरांत कार्यकर्त्यांनी पोहोचवावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.