नगर -भारतीय सैन्यदलाचा युनिफॉर्म, बनावट ओळखपत्र व चिन्ह वापरून सैनिक असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या बडतर्फ सैनिकास मिलिटरी इंटेलिजन्स व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत नागापूर एमआयडीसी परिसरातून जेरबंद केले.
प्रशांत भाऊराव पाटील (वय 32, रा. खानापूर, बेळगाव, कर्नाटक) असे या आरोपीचे नाव आहे. नागापूर एमआयडीसी परिसरात सैन्यदलात नोकरीस नसतानाही सैन्याचा गणवेश घालून व स्वतःच्या वाहनावर (क्र. एमएच- 10 सीएक्स- 6975) “ऑन ड्यूटी आर्मी’ असे नाव टाकून एक संशयीत फिरत आहे, अशी माहिती शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना मिलिटरी इंटेलिजन्स (जम्मू- काश्मीर) युनिट यांच्याकडून मिळाली होती.
अधीक्षक सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना या सैनिकाचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पवार यांनी पथक नेमून प्रशांत पाटील याचा शोध घेतला व त्याला अटक केली. पाटील याच्या अंगावर सैन्यदलाचा मेजर रॅंकचा युनिफॉर्म असल्याने मिलिटरी इंटेलिजन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पंचासमक्ष सध्याच्या नेमणुकीबाबत व पदाबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे संशय बळावल्याने त्याची झडती घेतली असता आर्मीचे बनावट ओळखपत्रे, ड्रेसवर लावण्याचे चिन्ह व फित, पाच वेगवेगळ्या बॅंकांचे एटीएम कार्ड, पेन्शन सिस्टीम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, आर्मीचे नोकरीसाठी वेगवेगळ्या लोकांकडून भरुन घेण्यात आलेले आवेदन पत्र, 14 पासबुक, वेगवेगळ्या बॅंकांचे सात चेकबुक, पाच मोबाईल, असा एकूण सात लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
ही कारवाई मिलिटरी इंटेलिजन्स, जम्मू काश्मीर युनिट यांच्या माहितीवरुन पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहायक फौजदार नाणेकर, पोलीस हवालदार मनोहर गोसावी, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, अण्णा पवार, विजय ठोंबरे, विश्वास बेरड, दिनेश मोरे, पोलीस शिपाई योगेश सातपुते, मयूर गायकवाड, तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, सदर्न कमांड लायझन युनिट मिलिटरी इंटेलिजन्स, नगर येथील कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केली.