विजय सोनवणे
खेड – सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील खेड ग्रामपंचायत कार्यालय स्वतःला लागणारी वीज स्वतः निर्माण करून ग्रामपंचायत आत्मनिर्भर बनली आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान आणि इतर निधी खर्च करून खेड गावासाठी तब्बल 60 लाख रुपयांची नुतून ग्रामसचिवलाय दुमजली इमारत उभी करण्यात आली आहे. या इमारतीतील सर्व उपकरणे ही सोलर प्रकल्पामधून तयार होणाऱ्या वीज निर्मितीतून कार्यान्वित करण्यात आली. अतिरिक्त भारनियमन, कमी-उच्च दाब तसेच भरमसाठ येणाऱ्या वीज बिलाला कायमचा आळा बसला आहे.
विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतीसह विविध शासकीय कार्यालये सोलर प्रकल्पावर वीजनिर्मिती करून आत्मनिर्भर करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्या संबंधिचा संपूर्ण मसुदा तयार करण्यात आला असून पुढील आर्थिक वर्षात राज्यांमध्ये नवीनीकरण ऊर्जा उत्पादनासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू केले जाणार आहेत. असे असले तरी तालुक्यातील ग्रामपंचायती विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर झाल्या तर तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.
याची सुरुवात खेडच्या ग्रामपंचायतने करून विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा मान मिळविला आहे. ग्रामपंचायतच नव्हे तर गावातील अनेक शासकीय कार्यालये व योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सरपंच अमृता वाघमारे यांनी सांगितले.
पाणीपुरवठा योजनाही सोलरवर!
खेड गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर सोलर प्रकल्प बसविण्यात आली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित होणार असून गावासाठी केव्हाही कधीही पाणी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे भरमसाठ विजेच्या बिलांवर कायमची कात्री बसणार आहे.