सोलापूर – येथील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका टेक्स्टाईल कारखान्याला आग लागल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. “रुपम विविंग मिल’ असे या कारखान्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास या कारखान्यामध्ये आग लागली होती. प्राथमिक अंदाजानुसार गॅसवर स्वयंपाक करत असताना आगीचा भडका उडून ही घटना घडल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
मनोज लक्ष्मीधर देहुरी (वय 20, रा. ओडिसा), आनंद लक्ष्मीनारायण बगदी (वय 30, रा. पश्चिम बंगाल) आणि सहदेव बुद्धवार बगदी (वय 22, रा. पश्चिम बंगाल) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघा परप्रांतीय कामगारांची नावे आहेत. रुपम विविंग मिल या कारखान्याच्या तळमजल्यावरती मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तर पहिल्या मजल्यावर कामगारांची राहण्याची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी कामगारांनी आपल्या स्वयंपाकासाठी गॅस शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी इत्यादी देखील लावून ठेवले होते. याच मजल्यावर पॅकेजिंगसाठी लागणारे रिकामे पुठ्ठे देखील ठेवण्यात आले होते.
आग लागल्यानंतर कामगाराने तिथे असलेल्या पुठ्ठे आणि टॉवेलच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने अधिकच भडका घेतल्याने त्याने तिथून पळ काढला. मात्र यावेळी शेजारी असलेल्या एका खोलीत तीन कामगार झोपलेले होते. आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्याने या तिघांना तिथून निघणे शक्य झाले नाही. त्यामुळे या तिघाही कामगारांचा आगीने होरपळून तसेच श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मागील आठवड्यातही आग –
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. मागील आठवड्यात देखील याच कारखान्यात आगीची घटना घडली होती. त्यावेळी अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली होती. यामुळे अग्निशमन दलाला कारखान्याच्या परिसराची माहिती आधीपासूनच होती. ही आग विझवण्यासाठी जवळपास 10 पाण्याच्या बंबांचा वापर करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलातर्फे देण्यात आली. पॅकेजिंगचे साहित्य जळाल्याने कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान जरी झाले नसले तरी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोठी हानी झाली.