जेनिन, (वेस्ट बॅंक) :- इस्रायलने आपल्या ताब्यातील वेस्ट बॅंकेच्या भूभागातून आपल्या सैन्याला मागे घेतले आहे. गेल्या 2 दिवसांपासून इस्रायलने सुरू केलेली छाप्याची कारवाई समाप्त झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या कारवाईमध्ये किमान 12 पॅलेस्टाईनी ठार झाले होते. तर हजारो लोकांना वेस्ट बॅंकेतून परागंदा होण्यास भाग पाडले गेले होते.
इस्रायलच्या या कारवाईदरम्यान तेथील मालमत्तेचे मोठे नुकसान देखील झाले होते. इस्रायलचा एक सैनिकही या कारवाईमध्ये मारला गेला होता. जेनिन रेफ्युजी कॅम्पमधील दहशतवादी गटांचे मोठे नुकसान या कारवाईमध्ये झाल्याचा दावा इस्रायलच्यावतीने करण्यात आला.
कारवाईच्यावेळी डझनभरवेळा हवाई हल्ले आणि पायदळाची कारवाईही केली गेली होती. परंतु वेस्ट बॅंकमध्ये सुमारे दीड वर्षांच्या जोरदार लढाईनंतर कोणताही दीर्घकाळ टिकणारा परिणाम होईल की नाही हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
इस्रायलने जरी आपले सैन्य मागे घेतले असले, तरी आवश्यकता भासल्यास अशीच कारवाई केली जाईल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे. जेनिन कॅम्पमधील दहशतवाद्यांच्या-विरोधात पुन्हा कारवाई केली जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
राजकीय प्रक्रियेच्या अनुपस्थितीमुळे हिंसाचार-पॅलेस्टाईन..
इस्रायलने दोन दशकांपूर्वी उघडपणे ताबा घेतलेल्या वेस्ट बॅंक परिसरामध्ये पॅलेस्टाईनच्या कारवाया वाढायला लागल्यावर इस्रायलने हा सशस्त्र छापा घातला होता. 2022 पासून जवळपास दररोज इस्रायलने वेस्ट बॅंक परिसरामध्ये छापे घातले आहेत. वेस्ट बॅंक परिसरामध्ये इस्रायलच्या ताब्यात कोणतीही राजकीय प्रक्रिया अस्तित्वातच नसल्यामुळे हा हिंसाचार होणे स्वाभाविक असल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे.