पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच बारावीच्या परीक्षा झाल्या असून, एमएचटी सीईटी, नीट, जेईई, एमबीए, पीएचडी, बीएस्सी अॅग्री, बी.फार्म, बीएस्सी नर्सिंग आदी व्यावसायिक अभ्यासक्रम, तसेच अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षाला प्रवेशोत्सुक विद्यार्थांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत जिल्हा जात पडताळणी समिती पुणे -३ विश्रांतवाडी येरवडा, येथील कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावी.
अर्जासोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, स्वतःचा आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारसपत्र, शपथपत्र, बोनाफाइड सर्टिफिकेट आदी पुराव्याच्या साक्षांकित प्रती जोडून आपल्या जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज तात्काळ वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. दिनेश डोके, उपायुक्त डॉ. दीपक खरात आणि संशोधन अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.