पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहर लोकसभा मतदार संघात वाढलेल्या मतदार संख्येत महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. त्यामध्ये सर्वाधिक पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदार संघातील महिला मतदारांची संख्या वाढली आहे. दरम्यान, पुणे लोकसभा मतदार संघातील महिला मतदारांची संख्या ९ लाख ७४ हजाराहून ९ लाख ९६ हजार २०८ इतकी झाली आहे.
पुणे शहर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. गेल्या अडीच महिन्यांत सहाही विधानसभा मतदार संघात महिला मतदारांच्या संख्येत किमान एक हजार ते साडेपाच हजारापर्यंत वाढ झाली आहे. त्यामध्ये वडगाव शेरी मतदार संघात एकूण मतदारांची संख्या ४ लाख ६३ हजार ६७१ असून त्यामध्ये महिला मतदारांची संख्या २ लाख २२ हजार ५१५ एवढी झाली आहे.
पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार २ लाख ८० हजार पैकी महिला मतदार संख्या १ लाख ७३ हजार २२ वर गेली आहे. तर, कसबा विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार संख्या २ लाख ७६ हजार ३८६ एवढी असून त्यापैकी महिला मतदारांची संख्या १ लाख ३९ हजार ३७६ एवढी झाली आहे. गेल्या अडीच महिन्यांत पुणे लोकसभा मतदार संघात ४४ हजार ७३ मतदारांची संख्या वाढली आहे. या वाढलेल्या मतदारांच्या संख्येत पन्नास टक्के म्हणजे २२ हजार ४४ एवढ्या महिला मतदारांचा समावेश आहे.