प्रयागराज – उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका आईने आपल्या एक वर्षाच्या पोटच्या मुलाला ट्रेनमधून बाहेर फेकल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या मुलाच्या वडिलांनी धावत्या ट्रेनमधून बाहेर उडी घेत मुलाचे प्राण वाचवले.
हा प्रकार यमुनापारच्या छिवकी जंक्शनवर घडला आहे. घटनास्थळी आरपीएफ आणि जीआरपीचे जवान उपस्थित होते. त्यांनी पीडित मुलगा आणि त्याच्या वडिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी मुलावर प्राथमिक उपचार केले असून, सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे.
जनता एक्स्प्रेस मधून चुनार, मिर्झापूर येथून बी २ या डब्यामध्ये शिवम सिंह आणि अंशू सिंह हे जोडपे प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक वर्षाचा मुलगा चुनार हासुद्धा होता. ते मुंबईच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान त्यांच्या हा एक वर्षाचा मुलगा सारखा रडत होता. दरम्यान पती शिवम सिंह याने या मुलाला शांत करण्यासाठी पत्नीला दूध पाजण्यास सांगितले. मात्र ही बाब पत्नी अंशू हिला रुचली नाही. त्यावर त्यांच्यात वाद सुरू झाला. अखेर संतापलेल्या अंशू हिने त्या एक वर्षाच्या मुलाला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले.