मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भाजपने कायमच अनुशासन पाळले आहे, परंतु संजय राऊत यांच्यासाठी अनुशासन पाळणार नाही. ऐशी की तैशी करु, असा थेट इशारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. शिवसेना, राम मंदिर, बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर अदखलपात्र आहे. हेच सत्य आहे, असेही शेलार म्हणाले.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. आशिष शेलार म्हणाले, मला शिवसेनेला प्रश्न विचारायचा आहे. बाबरी मशिद पाडल्यावेळी कोण कुठे होते तर सांगा.
तुमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे होते, मनोहर जोशी यांचे विमान कुठे भरकटले होते, ते बाबरी पाडली तेव्हा पोहोचले की, नंतर पोहोचले, ढाचा तुटल्यानंतर का पोहोचले? यामुळे असे धंदे करु नका, अयोध्येतील पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात एनसी जरी असेल तर दाखवा, तुम्ही अदखलपात्र आहात. मिस्टर संजय राऊत तुम्ही अदखलपात्र आहात, अशा शब्दांत शेलारांनी टोला लगाविला.