पुणे – कोरोनामुळे आपण फेस मास्क वापरायला लागलो आहोत. जगातल्या प्रदूषणयुक्त शहरांमध्ये आधीपासून मास्कचा ऐच्छिक वापर सुरू होता, तो आता या साथीमुळे अनिवार्य होत आहे. त्यामुळे कपड्यांसोबत मास्कमध्येही फॅशन दिसायला लागली आहे. मात्र, यामध्ये सर्वाधिक प्राधान्य एन-95 मास्कला मिळत आहे. सुरुवातीपासूनच अनेकजण हा मास्क वापरत होते.
दरम्यान, गेल्या दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले कि, वॉल्व असलेला एन-95 मास्क सुरक्षित नाही. जर एखाद्या व्यक्तीने असा मास्क घातला असल्यास त्याच्या श्वासातील व्हायरस फिल्टर म्हणजेच रेस्पिरेटरद्वारे बाहेर येऊ शकतात. त्यामुळे वॉल्व असलेले एन-95 मास्क वापरणे चुकीचे आहे. तसेच, डॉक्टरांनी देखील हा मास्क वापरू नये असे सांगितले आहे. घरीच बनवलेल्या सूती मास्कला प्राधान्य द्यावे असे त्यांचे म्हणणे आहे.
संसर्गापासून वाचण्यासाठी घरी बनवलेले मास्क अधिक फायदेशीर आहेत. चेहरा झाकण्यासाठी सुती कापडाचा वापरता करता येतो. याद्वारे मास्क बनविण्याआधी कापड 5 मिनिटे गरम पाण्यात धुवावे. मास्क घेताना तुमच्या आकाराचा आहे याची काळजी घ्यावी. अनेकदा लोक असे मास्क वापरतात, ज्यातून हवा आत-बाहेर येत जात असते. त्यामुळे असे मास्क संसर्ग रोखू शकत नाही.