कराड -करोनाचा फास सध्या सर्वत्र आवळत आहे. कार्वे गावातही करोना बाधितांची संख्या वाढत आहे. जवळपास पंचवीसच्या पुढे येथील रुग्णसंख्या गेली आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलली आहेत. ग्रामस्थांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन उपसरपंच रोहित जाधव यांनी केले आहे.
कार्वे, ता. कराड येथे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील हे गावात करोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत गावात अनेकवेळा जंतुनाशक फवारणी केली आहे. तसेच सर्वांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
गावातील युवकांना बरोबर घेऊन प्रबोधन करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. तो भाग सील केलेला आहे. तसेच बाधितांची संख्या वाढू लागल्यास त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सध्या गणेशोत्सव सुरू झाल्याने प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आल्याने समाधान होत आहे.
नागरिकांनी सॅनिटायझरचा हात आरतीसमोर पकडू नये, आरतीसाठी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. संकट काळात ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.