अणे- जुन्नरच्या पूर्व भागात आज (दि. 4) प्रचंड प्रमाणात दाट धुके पसरल्याने समोरचं काहीच दिसत नव्हते. गेल्या आठवड्यापासून असा सुखद अनुभव येथी, बेल्हे, राजुरी, गुंजाळवाडी, अणे, पेमदरा, साकोरी, निमगाव सावा, पारगाव, मंगरूळ या परिसरात अनुभवण्यास येत आहे.
सध्या परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात तळी साचत आहेत, रस्त्यावर खड्डे पडले आहेत, पाऊस अजूनही मुक्काम ठोकून आहे. संध्याकाळ झाली की बहुतेक ठिकाणी नियमितपणे हजेरी लावत आहे. मात्र, असे असले तरी जुन्नरच्या पूर्व भागात गेल्या आठवड्यापासून पहाटेच्या वेळी काहीसा गारवा आणि नंतर धुक्याची दुलई पांघरल्यासारखे वातावरण असून, ते आल्हाददायक वाटत आहे.
असा गारवा अनुभवण्यासाठी काही मंडळी माथेरान, महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जातात. मात्र, सध्या सकाळचे अणे घाटाचे चित्र निसर्गरम्य आहेण वाहणारा धबधबा आणि धुके पाहण्यासाठी नागरिक सकाळी घाटात जात आहेत. निसर्गाच्या सध्याच्या बदलत्या हवामानामुळे हा अनुभव जुन्नर भागातील नागरिक “मॉर्निंग वॉक’च्या वेळी घेत आहेत. या धुक्यात सेल्फी काढण्याची हौसही अनेकांनी यावेळी भागवून घेतली. सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास रस्त्यांनी जाणारी वाहने दिवे लावून जाताना दिसत होती. हे धुके साधारण दहा वाजेपर्यंत होते.