पिंपरी -पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची सतरावी बैठक आज (दि. 3) स्मार्ट सिटी कार्यालय ऍटो क्लस्टर येथे पार पडली. यावेळी स्मार्ट सिटीच्या 2022-23 च्या मूळ 429 कोटी 27 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी संचालक तथा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, विभागीय आयुक्त सौरव राव, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका आयुक्त राजेश पाटील आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या 2022-23 चे मूळ अंदाजपत्रक 429 कोटी 27 लाख 10 हजार 924 रुपयांचे अंदाजपत्रक मांडले आहे. त्यामध्ये प्रकल्पांवर 172 कोटी 8 लाख रुपये खर्च होणार आहे. तर 156 कोटी 46 लाख 10 हजार 924 रुपये शिल्लक राहणार आहे. या बैठकीमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांचे देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चाकरिता स्वतंत्र बॅंक खाते उघडण्याच्या प्रस्तावावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
शहरांना विविध आव्हानांना सामोरे जाताना नवनवीन उपाय-पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी स्मार्ट सिटीज मिशन, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय यांच्या वतीने सिटी इनोव्हेशन एक्सचेंज प्लॅटफॉर्म हे डिजिटल मार्केटप्लेस विकसित करण्यात येत आहे. त्या माध्यमातून शहरे आणि गुंतवणूकदार यांच्या दरम्यान सोपी आणि सर्वांना उपयुक्त ठरेल, अशी व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे. भारत सरकारने मंजूर केलेल्या पीसीएमसी स्मार्ट सिटी प्रस्तावाच्या अनुषंगाने, पॅन सिटी या उद्दिष्टांतर्गत गॅन्ट्री आणि वायफाय पोल उभारण्यासाठी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण शहरात 26 ठिकाणी पीपीपी तत्त्वावर 108 सार्वजनिक शौचालये विकसित करण्यात येणार आहेत.