ठोसेघर – सातारा शहरानंतर ग्रामीण भागातही आता विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजवडी फाट्यावर पोलीसांनी विनाकारण दुचाकी घेऊन बाहेर फिरणाऱ्यांच्या सहा दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. सातारा तालुक्याच्या पश्चिकेडील ग्रामिण भागात आदेशाचे उल्लंघन करून सर्रास हरताळ फासला जात आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. तरीदेखील काही नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत.
आवाहनची सौम्य भाषा ग्रामीण भागातील नागरिकांना लक्षात येत नसल्याने पोलिसांनी शहरानंतर आता ग्रामीण भागातही कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी, ठोसेघर मार्गावरील गजवडी फाट्यावर पोलीसांनी कारवाई करत सहा दुचाकी ताब्यात घेतल्या. आहेत. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांची याठिकाणी कसून चौकशी केली जात होती. त्यामुळे अनेक विनाकारण फिरणारे अलिकडूनच यू टर्न मारून माघारी फिरत होते. या कारवाईत तालुका पोलिस ठाण्याच्या परळी परिक्षेत्राचे पोलीस हवालदार दीपक बर्गे, सतीश पवार सहभागी झाले होते.