पुणे – “करोना’मुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व प्रकारच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तर, दि. 1 ते 14 एप्रिल हा कालावधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. तसा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.
“करोना’ संक्रमणामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यापूर्वी विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. तर पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. “करोना’मुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान, “कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाहीत. सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. पण, या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात यासंदर्भात विद्यापीठाकडून प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून सूचना व उपाय मागविल्या होत्या. त्यात 100 पेक्षा जास्त सूचना व उपाय विद्यापीठास प्राप्त झाले असून, त्यांची छाननी करून नवीन परीक्षा पद्धती ठरवली जाणार आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. दि.13 ते 17 मार्च या कालावधीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काही पेपर झाले आहेत. तसेच त्यांना क्रेडिट सिस्टीम असल्याने या विद्यार्थ्यांचे द्वितीय वर्षात जाताना मूल्यांकन होणे गरजेचे असून त्यांच्या इतर प्रकारे परीक्षा होणार आहेत.
लॉकडाउननंतर 10 दिवसांनी वेळापत्रक
लॉकडाउननंतर विद्यापीठाला परीक्षेसाठी तयारी करावी लागणार आहे. तसेच काही वर्गांचा अभ्यासक्रम किंवा प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल सबमिशन राहिले असल्याने त्यांना वेळ देणे आवश्यक आहे. लॉकडाउन संपल्यानंतर किमान 10 दिवसांच्या कालावधीनंतर परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.