शेअर निर्देशांक कोसळले तीन टक्क्यांनी
मुंबई – भारतातील शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर असतानाच ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेत बदललेल्या करोनाचा ( न्यू करोना व्हेरीयन्ट) संसर्ग वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा नवा करोना व्हायरस 70 टक्के अधिक संसर्ग वाढवू शकणारा असल्यामुळे भारतासह अनके देशानी ब्रिटनबरोबरची विमान सेवा बंद करून टाकली आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी कोसळले. ( The stock index collapsed )
निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे अगोदरच नियमीत करेक्शनची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत नव्या करोनामुळे आरोग्यविषयक आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम जागतिक व्यापारावर आणि उद्योगधंद्यावर होईल असे गुंतवणूकदारांना वाटल्यामुळे सोमवारी तुफान विक्री झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1406 अंकांनी म्हणजे 3 टक्क्यांनी कोसळून 45,553 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 432 अंकांनी कोसळून 13,328 अंकांवर बंद झाला.
रुपया कोसळला 21 पैशांनी…
नव्या करोनामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही झाला. रुपया 21 पैशांनी कोसळून रुपयाचा भाव 73.78 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. जागतिक परिस्थिती खराब झाल्यामुळे चलन व्यापारी डॉलरची खरेदी करीत असल्याचे दिसून आले.
विक्रीचा जोर इतका होता की बहुतांश क्षेत्राचे निर्देशांक सोमवारी कोसळले. त्यामुळे गुतवणूदारांचे 6.6 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान झाले. शेअर बाजाराशी संबंधीत विविध घटकात बदल झाल्यामुळे अस्थिरता निर्देशांक 25 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे गुंतवणूकदारांना फारच सावध राहवे लागणार आहे.
आजच्या विक्रीच्या माऱ्यात बॅंकांचे सर्वाधिक नुकसान झाले. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक निर्देशांक 7 टक्क्यांनी कोसळला. धातू, पायाभूत सुविधा, वाहन, ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक चार ते पाच टक्क्यांपर्यंत कोसळले. विक्रीचा जोर इतका होता की निफ्टीसंदर्भातील सर्व 50 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्याचे दिसून आले.
विश्लेषकांनी सांगितले की, निर्देशांक आगोदरच उच्च पातळीवर असतांनाच इंग्लंडमध्ये नवा करोना आल्यामुळे जागतिक पातळीवर शेअर निर्देशांकाचे नुकसान झाले. आता निफ्टिला 12,960 वर आधार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी काही काळ थांबून परिस्थितीचा अंदाज घेण्याची गरज आहे.