इस्लामाबाद – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद वसीमची राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 2023च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत असणार आहे. मुख्य निवडक पदासाठी गुरुवारी व शुक्रवारी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यानंतर मोहम्मद वसीम यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांनी त्याला मान्यता दिली.
मोहम्मद वसीम हा मिसबाह उल हक निवड समितीचा सदस्य होता. जानेवारीच्या मध्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन कसोटी आणि 3 टी -20 सामन्यांसाठी संघ निवडीचे काम त्यांना पाहावे लागणार आहे. यापूर्वी वसीम नॉर्दन क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षकपदी त्यांनी भूषविलेले आहे.
मोहम्मद वसीमने 1996 ते 2000 पर्यंत पाकिस्तानकडून 18 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने कारकिर्दीत 191 प्रथम श्रेणी सामनेदेखील खेळले आहेत.
आपल्या नियुक्तीबाबत वसीम म्हणाले, मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण की मला बऱ्याच सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आणि मला विश्वास आहे की या आव्हानात्मक भूमिकेदरम्यान मी जे काही शिकलो त्याचा उपयोग करण्यास मी सक्षम आहे. पुढील वर्षांत आमचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे आणि मी सकारात्मक निवडीकडे लक्ष देईन. पाकिस्तान संघातील खेळाडूंकडे प्रतिभेची कमतरता नाही आणि त्यांना पूर्ण संधी मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
मोहम्मद वसीम व्यतिरिक्त माजी यष्टीरक्षक सलीम युसूफची पीसीबी क्रिकेट समितीचा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. या समितीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या दोन दिग्गजांच्या नियुक्तीबद्दल पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी आनंद व्यक्त केला.