कराची – करोनाच्या पहिल्या चाचणीत पॉझिटिव्ह ठरलेल्या पाकिस्तान संघातील 10 पैकी 6 खेळाडू करण्यात आलेल्या नव्या चाचणीत निगेटिव्ह ठरले आहेत. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून आता हे खेळाडूदेखील संघात सामील होणार आहेत, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने जाहीर केली आहे.
या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी महंमद हाफिजसह सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात हाफिजसह एकूण 10 खेळाडू पॉझिटिव्ह ठरले होते. त्यावेळी हाफिजने एका खासगी लॅबमधून चाचणी करवून घेतली होती व त्यात तो निगेटिव्ह ठरला होता.
त्यामुळे पाक मंडळाने पुन्हा एकदा देशातील अधिकृत चाचणी केंद्रात पुन्हा एकदा या खेळाडूंची चाचणी केली व त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आता इंग्लंडला रवाना होण्याची परवानगी देण्यात आली आहे. हाफिजसह फखर झमान, महंमद हुसेन, महंमद रिझवान, शादाब खान आणि वहाब रियाज हे सहा खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत.