राज्य ग्राहक आयोग सर्किट बेंचची सुनावणी पुढे ढकलली
पुणे – राज्य ग्राहक आयोगाकडून न्याय मिळविण्यासाठी ग्राहकांना सहा महिने वाट पहावी लागणार आहे. आयोगाच्या सर्किट बेंचची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. करोनामुळे सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पुण्यात होणारी सुनावणी आता थेट पुढच्या वर्षीच होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सुनावणीसाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
सर्किट बेंचची सुनावणी पुण्यात या महिन्यात 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान होणार होती. मात्र ती पुढे ढकलली आहे. ऑक्टोबरमध्ये होणारी ही सुनावणी आता मार्च 2021 मध्ये होणार आहे. राज्य आयोगाने काढलेल्या परिपत्रकात याबाबत नमूद केले आहे.
तसेच, सुनावणीसाठी असलेल्या दाव्यांना पुढील तारखा दिल्या आहेत. लॉकडाऊन तसेच अनलॉकनंतरही आयोगाचे कामकाज सुरळीत सुरु झालेले नाही. करोनामुळे तातडींच्या दाव्यांसाठी कामकाज सुरू होते.
राज्य आयोगापुढे दावा दाखल करण्यासाठी तसेच जिल्हा आयोगाने दिलेल्या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी मुंबईला जावे लागत होते. मात्र, आयोगाचे सर्किट बेंच पुण्यात येऊन सुनावणी घेऊ लागल्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होत आहे.